४८ वर्षीय अस्मिना आणि तिची मैत्रीण झुबैदा आपल्याबालपणीच्या आठवणींना उजाळा देताना मनमुराद हसतात. या आठवणी म्हणजे, त्यांच्या आयांनी फेकून दिलेल्या गव्हाच्या पेंढ्यांच्या उरल्यासुरल्या काड्यांपासून विणलेल्या छोट्या-छोट्या टोपल्यांच्या. मेवात प्रांतातील इतर मुलींप्रमाणेच, या दोघीही लहानपणापासून टोपल्या विणायला शिकल्या; कारण त्यांच्या आयांचा तसा आग्रह होता. मात्र, हीच कला पुढे जाऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन बनेल, याची त्यांना तेव्हा पुसटशीही कल्पना नव्हती.
“आम्ही टोपल्या सहज तयार करायचो अन् नातेवाईकांना देऊन टाकायचो. पण आता त्या आमच्या उत्पन्नांचं साधन आहेत, म्हणूनच त्या फुकटात कुणाला दिल्या जात नाहीत,” अस्मिना बोलता बोलता खुदकन हसते.
या दोघी हरियाणातल्या नूह जिल्ह्यातल्या घसेरा गावात राहतात. घराच्या अंगणातल्या सिमेंटच्या बाकावर बसून अस्मिना टोपली विणायला सुरुवात करते. तिने देशी गव्हाची एक मोठी काडी हातात घेतली अन् बारीक सुईच्या सहाय्याने तिच्या बारीक तारा काढायला सुरुवात केली. त्यातली एक एक तार ती अत्यंत कुशलपणे विणायला सुरुवात करते अन् त्यातून निर्मिती होते चंगेरीची.
“जर कधी घरी पाहुणे आले अन् मी त्यांना पोळी किंवा भाकरी चंगेरीमध्ये ठेवून वाढली नाही तर ते नाराज होतात आणि म्हणतात की, अस्मिनाने पोळ्या ताटात वाढल्या, चंगेरीमध्ये नाही,” अस्मिना सांगते.
चंगेरी वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरली जाते. हरियाणा आणि राजस्थानच्या मेवात प्रांतातील स्त्रिया पिढ्यानपिढ्या या टोपल्या विणत आल्या आहेत. एक काळ असा होता, जेव्हा लग्नसमारंभ, ईद आणि इतर सणासुदीच्या वेळी भेटवस्तूंमध्ये या टोपल्या एक अविभाज्य भाग होत्या.

















